नुकतेच आमच्या सोसायटी मध्ये पेस्ट कंट्रोल झाले. सकाळी खाली उतरलो तेव्हा मेलेल्या झुरळांचा खच पडला होता. एवढी सगळी झुरळे होती कुठे, आली कुठून? मला आश्चर्य वाटले. संध्याकाळी घरी परत आलो तेव्हा बाल्कनीत सुद्धा एक झुरळ मेलेले दिसले. तेव्हा मात्र काळजी वाटली. नुकतेच जीवित नदी या संस्थेनी विष मुक्त जीवनशैली या विषयावर कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत शैलजा ताईंनी आपल्या रोजच्या जगण्यात कशी अनेक केमिकल्स शामिल झाली आहेत याबद्दल मांडणी केली होती. तेव्हापासून मनात हे केमिकल विषयक चक्र फिरत होतं.
मी सातव्या मजल्यावर राहतो. पेस्ट कंट्रोल चा प्रभाव सातव्या मजल्या पर्यंत पोचला होता याची साक्ष होते ते मेलेले झुरळ. याच बाल्कनीत आम्ही भाजी उगवतो. नुकतीच कोथिंबीर व मेथी लावली होती. त्यावरही हा फवारा पडला असणार आणि लवकरच आम्ही हे अन्न जेवणार असल्यामुळे हे झुरळांना मारणारे विष लवकरच काही अंशी तरी माझ्या शरीरात जाणार. समजा जरी आम्ही मेथी धुऊन घेतली तरी आम्ही बरेचदा हेच पाणी साठवून झाडांना देतो. तेव्हा त्याच पाण्यावर पुन्हा झाडे वाढतात व त्यात ते जाणार आणि पुन्हा आमच्या शरीरात येणारच.
आपली जीवचक्रे एकमेकात गोवलेली आहेत. ती चक्र घरात फिरायला लागली की आपण अधिक संवेदनशील होतो हे नक्की!
संध्याकाळी सोसायटीत एक शेजारी काका भेटले त्यांनी विचारले की ही मेलेली झुरळे वायु मध्ये (म्हणजे आमच्या घरातील बायोगॅस यंत्र) टाकता येतील का? तेव्हा मनात विचार आला ही झुरळे नैसर्गिक मरण पावली असती तर नक्की वायु नी जिरवली असती. पण आता त्यातील विषामुळे ती मी वायु मध्ये टाकणार नाही. कोणास ठाऊक त्याने वायु मधील जिवाणूंवर काय परिणाम होईल?
चक्र घरात फिरणारे असो की शहरभर की पृथ्विभर. शेवटी ते चक्रच की! कोणत्या न कोणत्या पद्धतीने ते आपल्या शरीरात येईलच ना! तेव्हा पेस्ट कंट्रोल ला पर्याय शोधायला हवा. गंमत आहे ना. हे जीवन चक्र असे आहे की स्वार्थ आणि परमार्थ यातील द्वैत संपुष्टात आणते.
–
प्रियदर्शन सहस्रबुद्धे